खेड : खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिलांसाठी मॅट रांगोळी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. खेड शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाला बचत गटांतील महिलांसह सुमारे १०० महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम खेड नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मॅट रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. महिलांची संख्या लक्षात घेऊन हे प्रशिक्षण दोन बॅचमध्ये घेण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना पारंपरिक कलेसोबतच आधुनिक रांगोळीच्या प्रकारांचे कौशल्य शिकण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राकेश खेडेकर, उपसभापती वर्षा तुषार सापटे, समिती सदस्या दीप्तीताई शिगवण, स्वप्नाली चव्हाण आणि मीनारजी चिखले यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष पप्पूशेठ चिकणे, मुख्याधिकारी रोडगे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमळ चिखले व स्वप्निल सेतवडेकर, नगरसेविका नीता आंब्रे आणि कुरणे यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमासाठी नगरपरिषदेतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले. महिलांना कौशल्यविकासाच्या माध्यमातून स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहित करण्यासाठी असे प्रशिक्षण उपक्रम उपयुक्त ठरत आहेत.