कुडोशी : कुडोशी येथील ग्रामदेवता श्री जनी भैरी देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. विधीवत पूजाअर्चा करून देवीची रूपे सजविण्यात आली, तसेच घटस्थापना करण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने पुढील नऊ दिवस गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत गावातील प्रत्येक वाडीतर्फे देवीचा जागर केला जातो. या परंपरेनुसार देवीच्या पहाऱ्याची जबाबदारी वाडीनुसार पार पाडली जाते. दररोज जाखडी नृत्य आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच दररोज रात्री दहा वाजता संपूर्ण गाव एकत्र येऊन देवीची आरती केली जाते. आरतीनंतर नृत्य आणि भजनाचे कार्यक्रम होतात.

दसऱ्याच्या दिवशी घट उठविण्याचा धार्मिक विधी पार पडणार असून, त्यानंतर शिवलग्न सोहळा आयोजित केला जाणार आहे. या दिवशी ग्रामस्थ एकमेकांना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. अशा प्रकारे धार्मिक विधी, पारंपरिक कला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून कुडोशी येथील श्री जनी भैरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो.