मंडणगड : मंडणगड ते वेळास मार्गावर मालेगाव येथील साईसावली फार्महाऊससमोर ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास एस.टी. बसचा अपघात झाला होता एस.टी.बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या फार्महाऊसच्या कंपाउंडच्या भिंतीला धडकली. या अपघातात बसमधील तीन महिला प्रवासी जखमी झाल्या होत्या याचबरोबर फार्महाऊसच्या भिंतीचेही नुकसान झाले होते.
या प्रकरणी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर २०२६ रोजी एस.टी.चे चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी.बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी.२६६३ ही मंडणगडहून वेळासच्या दिशेने जात होती. मालेगाव एसटी बसथांब्याजवळ समोरून येणाऱ्या एस.टी.बसला बाजू देत असताना चालक मंगेश नरहरी वाघमारे (वय ३५, रा. सध्या मंडणगड एसटी आगार, मूळ रा. मानपूर, ता. यवतमाळ) यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस फार्महाऊसच्या कंपाउंडच्या भिंतीला धडकली.
या अपघातात गाडीतील प्रवासी प्रवीणा प्रविण मयेकर (वय ४१, रा. वेळास), प्रेरणा सचिन साळवी (वय ४०, रा. शिपोळेगाव) आणि प्रियांका गणेश कदम (वय ५३, रा. वेरळ तर्फे वेसवी) या तीन महिला जखमी झाल्या. अपघातामुळे एस.टी.बसचे तसेच फार्महाऊसच्या भिंतीचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास बाणकोट सागरी पोलीस करीत आहेत.