मंडणगड : पावसाने दडी मारल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. टाकेडे ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि उत्कर्ष महिला मंडळ, टाकेडे यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर ग्रामपंचायत हद्दीतील हौदाचा ओहळ येथे दोन वनराई बंधारे उभारण्यात आले. या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.
या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य ग्रुप ग्रामपंचायत पालघरचे सचिव श्री. पालवे यांनी उपलब्ध करून दिले. मंडळाचे सदस्य श्री. रमेश चाळके यांनी स्वतःच्या नांगराच्या साहाय्याने जमीन नांगरून बंधाऱ्यांसाठी माती उपलब्ध करून दिली.
मंडळाचे अध्यक्ष अनंत शिंदे, उपाध्यक्ष एकनाथ चव्हाण, सचिव अनिल गणवे, माजी सभापती अमिता शिंदे, मंडळाचे सल्लागार सिताराम सुर्वे आणि ग्रामपंचायत सचिव श्री. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. या उपक्रमात गावातील बहुसंख्य ग्रामस्थांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाचे काम उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण टाकेडे येथील या उपक्रमातून समोर आले आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी अशा उपक्रमांची ग्रामीण भागात गरज आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि सहभागी सदस्यांचे मंडळाचे अध्यक्ष अनंत शिंदे यांनी आभार मानले.
श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श; टाकेडे येथे दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी…
