चिपळूण : गायक तथा दैनिक सागरचे प्रतिनिधी देवेंद्र जाबरे यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन गीतगायन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहोळा रविवार, 18 ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होईल.
इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी अशा दोन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील गायनकला, आत्मविश्वास आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सोहोळ्याला चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेवक रमेश खळे, कुणबी सेना तालुकाप्रमुख संजय जाबरे, शाहीर शाहीद खेरटकर, ओंकार संगीत साधना केंद्राचे संचालक सतीश कुंटे, राष्ट्रीय कीर्तनकार जनार्दन आंब्रे, कवी व साहित्यिक राष्ट्रपाल सावंत, वादक व संगीतकार अरविंद जोगळे आणि कुणबी सेनेचे उपतालुकाप्रमुख राजेंद्र पवार, कवी संतोष कुळे, गीतकार आकाश निर्मळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली खर्चे करणार असून, ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे आभार मानतील. या सोहोळ्याला विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक देवेंद्र जाबरे यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेचा निकाल १८ ऑक्टोबरला; पारितोषिक वितरण सोहळा चिपळुणात
