दापोली : तालुक्यातील नाभिक समाजाने पाहिलेले श्री संत सेना महाराजांच्या मंदिराचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले असून, या नूतन मंदिराचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने दापोली शहरातून श्री संतसेना महाराज,गणराय आणि विठ्ठल रखुमाई या मुर्त्यांची वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती.यामध्ये समाजातील पुरुष, महिला,अबाल वृद्ध सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते. या नगर प्रदक्षिणा दरम्यान विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मार्गात उत्साहात स्वागत केले.​या मिरवणुकीला शहरासहित तालुक्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

​नगर प्रदक्षिणा नंतर मंदिरात विधिवत मूर्ती प्रतिष्ठापना आणि धार्मिक विधी पार पडले.या पवित्र प्रसंगी मंदिरात पूजन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाज बांधवांसहित परिसरातील तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत सेना महाराजांचे दर्शन घेतले.दर्शनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी 4 ते 9 या वेळेत मंदिर उभारण्या कामी ज्यांनी उदात्य हेतूने वस्तूरुपी तर कोणी आर्थिक स्वरूपात मदत दिली त्या सर्व देणगीदार तसेच नाभिक समाजातील ज्या व्यक्तींनी या कामात अमूल्य योगदान दिले, अशा सर्व देणगीदार आणि समाजबांधवांचा याप्रसंगी विशेष गौरव करण्यात आला.यावेळी सत्कारमूर्ती मान्यवरांनी नाभिक समाजाचे समाजाप्रति असलेले योगदान याबद्दल गौरव उद्गार काढत समाधान व्यक्त केले.दरम्यान आयोजित सभेमध्ये नाभिक समाजातील प्रमुख मान्यवरांनी व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करताना मंदिर उभारणीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, प्रशासनाचे आणि उपस्थित सर्वांचे यावेळी मनःपूर्वक आभार मानले. समाजाच्या संघटित प्रयत्नांमुळेच हे शिवधनुष्य पेलले गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

​दिवसभराच्या विविध धार्मिक व सत्कार सोहळ्यानंतर,रात्रीच्या सत्रात भक्तीमय वातावरणात ‘सुसर भजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भजनाने उपस्थितांची मने जिंकली आणि सोहळ्याची सांगता अत्यंत आनंदात करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज मंदिर जीर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी,नाभिक समाज दापोली शहर संघटनेचे सर्व पदाधिकारी, नाभिक समाज संघटना तालुका दापोलीचे सर्व पदाधिकारी,दापोली तालुका महिला नाभिक समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी तसेच दापोली महिला शहर संघटनेने विशेष प्रयत्न केले.