चिपळूण : येथील श्री भैरी भवानी नवरात्रोत्सवाच्यावतीने दुष्काळ निवारणासाठी वाशिष्ठीच्या तिरी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील पटांगणात ही गंगा आरती होणार आहे. त्यासाठी खास वाराणसी येथून भक्तगण आरतीसाठी येणार आहेत.
श्री भैरी भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी मोठ्या उत्सहात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करीत असते. दि. 15 रोजी श्री वाघदेवी भजन मंडळ, ढोक्रवली यांचे भजन, दि. 16 रोजी जय हनुमान नाच मंडळ कुंभारवाडी टेरव यांचे जाखडी नृत्य, दि. 18 रोजी देवीचा गोंधळ, भोंडला व रांगोळी स्पर्धा तसेच दांडिया होईल. दि. 19 रोजी रास दांडिया, दि. 20 रोजी दसरा व दांडिया होईल तर 21 रोजी महाप्रसाद आणि विसर्जन सोहळा होणार आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणी काशी विश्वनाथ नगरीतील गंगा आरती होणार आहे. अनेकांना वाराणसीतील गंगा आरतीला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ही गंंगा आरती ही चिपळूणमध्ये केली जाणार आहे. वाशिष्ठीच्या तिरावर परशुराम भूमीत हा अनुभव घेता येणार आहे. सद्यस्थितीत दुष्काळाचे सावट आहे. भविष्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना समजून यावे, या हेतूने या गंगा आरतीला विशेष महत्त्व आहे. यावेळी गंगा मातेला, दुष्काळाचे निवारण कर’ असे आवाहन केले जाणार आहे. नदी ही केवळ नदी नसून मानवी जीवनाला जीवन देणारी देवी मानली जाते. सूर्योदय व सूर्यास्तावेळी नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गंगा आरती केली जाते. यावेळी शंख, घंटा, मंत्रोपचार होणार आहेत. गंगा नदीत स्नान केल्यानंतर पाप नष्ट होते असे सांगितले जाते. या आरतीमधून सामूहीक एकात्मता साधली जाते. वाराणसी, हरिद्वार आणि ऋषिकेश येथील आरतीमध्ये देश-विदेशातील हजारो नागरिक एकत्र येत असतात. या पार्श्वभूमीवर चिपळुणातील गंगा आरतीला विशेष महत्त्व आले आहे. दुष्काळाशी लढण्यासाठी सामूहीक ताकद निर्माण व्हावी या उद्देशाने ही गंगा आरती आयोजित करण्यात आली आहे. गंगा आरतीमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन भैरी भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.
चिपळुणात दुष्काळ निवारणार्थ होणार ‘गंगा आरती’…
