चिपळूण : गाणे-खडपोली येथील साफयीस्ट कंपनी प्रा. लि.च्या निवृत्त कामगारांना करारानुसार मिळणे अपेक्षित असलेल्या ग्रॅच्युइटीच्या रकमेपैकी चार दिवसांची रक्कम अद्याप मिळाली नसल्याची तक्रार कामगारांनी शिवसेना नेते तथा सचिव, माजी खासदार मा. विनायकजी राऊत यांच्याकडे केली. नवरात्रोत्सवानिमित्त खडपोली येथे झालेल्या त्यांच्या दौऱ्यादरम्यान निवृत्त कामगारांनी निवेदन देऊन न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. या प्रश्नात लक्ष घालून पुढील कार्यवाहीसाठी सूचना करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.
कामगारांच्या निवेदनानुसार, संबंधित कर्मचारी कंपनीच्या सुरुवातीपासून, म्हणजे १९८२ पासून कार्यरत होते. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युइटी दोन टप्प्यांत देण्यात आली. करारानुसार २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कामगारांना ३० दिवसांची ग्रॅच्युइटी मिळणे अपेक्षित असताना, मुंबई मुख्य कार्यालयाकडून २५ दिवसांची रक्कम आणि गाणे-खडपोली कार्यालयाकडून उर्वरित पाच दिवसांची रक्कम देताना हिशोबात विसंगती असल्याचा कामगारांचा आरोप आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या टप्प्यातील रकमेचा स्पष्ट लेखी हिशोब दिलेला नसून प्रत्यक्षात चार दिवसांची रक्कम थकीत आहे.
या प्रश्नाबाबत कामगारांनी कंपनीशी पत्रव्यवहार केला असून, रत्नागिरीच्या कामगार आयुक्तांकडेही दाद मागितली. मात्र, समझोत्यातून तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
युवासेनेच्या माध्यमातूनही तक्रारीची दखल
यापूर्वी संबंधित निवृत्त कामगारांनी युवासेना पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर शहरप्रमुख सचिन भैय्या कदम, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे आणि युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांची तक्रार समजून घेतली. संबंधित कागदपत्रे आणि कंपनीसोबतच्या कराराची पडताळणी करून चर्चा करण्यात आली.
या प्रकरणात निवृत्त कामगारांना करारानुसार देय असलेली रक्कम मिळते का, याची कागदपत्रांच्या आधारे स्पष्टता होणे आवश्यक आहे. कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने कंपनीने देयकांचा सविस्तर लेखी हिशोब देऊन तक्रारीचे पारदर्शक निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये आणि उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवृत्त कामगारांच्या हक्काच्या देयकाबाबत वस्तुनिष्ठ पडताळणी होऊन त्यांना न्याय मिळावा, हीच या पाठपुराव्यामागील प्रमुख अपेक्षा आहे.
