खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेचे प्राचार्य श्री. राजकुमार मगदूम यांना शिक्षक दिना निमित्त दिला जाणारा EMSA (English Medium School Association) कोल्हापूरचा BEST Principal Award – 2026 ( बेस्ट प्रिन्सिपल ॲवार्ड 2026 चा) पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. EMSA कोल्हापूर मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेले शिक्षक , मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्था यांना पुरस्कारांचे वितरण केले जाते.
सन 2018 पासून अशा पुरस्कारांचे वितरण प्रत्येक वर्षी केले जाते, शाळेचे सर्व प्रकारचे आतापर्यंतचे निकाल, शाळेत राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम आणि शैक्षणिक प्रगती असे निकष अशा पुरस्कारासाठी आहेत, EMSA तर्फे तज्ज्ञांची समिती नेमून त्यासमितीद्वारे सर्व प्रकारची माहिती व मुलाखत अशा प्रकारे पुरस्कार जाहीर केला जातात, सन 2018 पासून आजअखेर एकूण 234 पुरस्कारांचे वितरण झाले आहेत. यावर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ दि 24 सप्टेंबर 2026 रोजी हॉटेल सयाजी , कोल्हापूर येथे संपन्न झाला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 38 शिक्षक व 15 मुख्याध्यापक यांना गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर हे उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य श्री. राजकुमार मगदूम यांना सदर पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. व महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी सतत कार्यरत राहून , शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर उत्कृष्ट दर्जाचे निकाल देणे, स्पर्धा परीक्षामध्ये प्रशालेस उत्तुंग यश मिळवून देणे त्याचप्रमाणे नावीन्यतेचा ध्यास घेणे व सकारात्मक दृष्टीने विचार करणे हे तत्त्व उराशी बाळगून सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. EMSA कोल्हापूर या संस्थेने सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला हे ज्ञानदीप परिवाराला अभिमानास्पद आहे.
