रायगड : खरीप हंगाम २०२६ च्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, पेण आणि सुधागड या पाच तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, पावसातील खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे शेती संकटात असताना या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश का करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित तालुक्यांची तातडीने पाहणी करून दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी (दि.१४) निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी निवेदन स्वीकारले.
अलिबाग, मुरुड, रोहा, पेण आणि सुधागड-पाली तालुक्यांतील पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि संभाव्य नुकसानीची तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करावी. महसूल व कृषी विभागाने गावनिहाय पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार करावा. या अहवालाच्या आधारे पाचही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी राज्य शासनाकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत मिळवून द्यावी. वस्तुस्थितीचा अहवाल कोकण विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाकडे तातडीने पाठवावा, अशा प्रमुख मागण्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या आहेत
यावेळी शिवसेना रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, तालुकाप्रमुख शंकर गुरव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.