चिपळूण : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत लक्ष महाराष्ट्र यांच्या आयोजनातून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद – जागर आरोग्याचा’ या अभियानाचा शुभारंभ दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी एमएस महाविद्यालय व परशुराम हॉस्पिटल घाणेखुंट लोटे येथे झाला. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधण्यात आला.
नवरात्रीच्या काळात राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आरोग्यविषयक व्याख्याने व वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी आरोग्य प्रतिज्ञा केली. त्यानंतर मानसिक आरोग्य या विषयावर विद्यार्थी समुपदेशक स्नेहा साडविलकर यांनी व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानसिक ताण, वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप व आहारातील चुकीच्या सवयी यांचा तरुणांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
प्राचार्यांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन उत्पात यांनी दैनंदिन जीवनात आरोग्याचे महत्त्व विशद केले. नियमित व्यायाम, योग्य आहार, विश्रांती आणि सकारात्मक मानसिकता यांचा विद्यार्थी जीवनात समावेश करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
उपस्थिती व आभार
महाविद्यालयाचे विद्यापीठ नोडल अधिकारी डॉ. श्रेयस जोशी यांनी कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी उपस्थितांचे आभार मानले. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे महाविद्यालयीन नोडल अधिकारी डॉ. अनिल लोहार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेला नऊ दिवसांचा विशेष उपक्रम असून, त्याच्यामार्फत वैद्यकीय तज्ज्ञ व प्राध्यापक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत.
