मंडणगड : तालुका विकास मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव या प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुले व मुली या दोन्ही संघांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये लालबहादूर शास्त्री हायस्कूलचे १४ वर्षांखालील मुले व मुलींचे संघ सहभागी झाले होते. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली व द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले.
या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल पालकवर्ग आणि परिसरातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.