सावर्डे : पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षांचे संरक्षण आणि भविष्यातील पर्यावरणीय संकटांना सामोरे जाण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सामाजिक बांधिलकीतून मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नूतन जिल्हा परिषद सदस्या तथा पंचायत समिती चिपळूणच्या माजी सभापती सौ. पूजा शेखरजी निकम यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम साकार होत आहे.

महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडजवळील दुभाजकांवर शोभिवंत झाडांची लागवड करून परिसराचे सौंदर्य वाढविणे आणि महामार्गाला लागून हिरवागार पट्टा (ग्रीन बेल्ट) विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केवळ परिसराचे सुशोभीकरण न करता वृक्षसंवर्धनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

या उपक्रमात सीनियर कॉलेज, शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय आणि इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांचा सहभाग आहे. विविध शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करतो.

‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून रुजविणे, मातृभूमीच्या रक्षणाची भावना दृढ करणे आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार पर्यावरण निर्माण करणे, या व्यापक दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सह्याद्रीच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत पर्यावरण रक्षणासाठी उचललेले हे पाऊल परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे ठरणार आहे. वृक्षारोपण प्रसंगी सौ पूजा ताई निकम सावर्डे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते