मुंबई : देशभरात माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी होत आहे. डॉ. कलाम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाची प्रगती, उन्नती आणि विकसित राष्ट्र घडवण्यासाठी काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ‘वुई विल डू इट’ असे म्हणतात, तेव्हा ते स्वतःला डॉ. कलाम यांच्या विचारांशी जोडतात. आज देशात काही प्रवृत्ती अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना डॉ. कलाम यांच्या मार्गावर चालणाऱ्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, अल्पसंख्याक मोर्चाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान तसेच सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
दहशतवाद आणि बनावट चलनी नोटांच्या माध्यमातून जे लोक आपल्या देशाची प्रगती रोखू शकले नाहीत ते आता देशात घुसून तरुणांची दिशाभूल करण्याचे, त्यांना रस्त्यावर बसवण्याचे आणि आंदोलनात सहभागी करण्याचे काम करत आहेत. विकसित भारताचे स्वप्न त्यांना साकार होऊ द्यायचे नाही. कारण त्यांचे रिमोट कंट्रोल परकीय शक्तींच्या हातात आहे. हिंदुस्थानची ताकद विविधतेतील एकता आहे. हिंदुस्थानची ताकद विविधतेतील एकता आहे. भारताने नेहमीच सर्व धर्म, जाती आणि पंथांच्या लोकांना सोबत घेऊन घेऊन चालण्याची क्षमता दाखवली आहे. आपण सर्वांचा सन्मान करतो. मात्र, जेव्हा कोणी आपल्या देशावर प्रहार करतो तेव्हा त्याचा मुकाबला करण्याचीही या देशाची परंपरा आणि इतिहास आहे, असे कुंवर बासित अली यांनी नमूद केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या सहवासात होते. मुलांना शिक्षण घेत विकसित भारत 2047 चे स्वप्न कशाप्रकारे साकार करता येईल, हे सांगण्यासाठी ते व्यासपीठावर आपले विचार मांडत होते. त्याचप्रमाणे देशातील 140 कोटी जनतेने कलाम साहेबांच्या भारताला पुढे नेण्याचे तसेच देश विकसित घडवण्यासाठी मोदीजींच्या प्रयत्नांमध्ये योगदान दिले पाहिजे. आज संरक्षण, वैद्यकीय क्षेत्र, परराष्ट्र धोरणात आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर भारत आपली भूमिका जगासमोर ठामपणे मांडत आहे. क्रीडाक्षेत्र असो किंवा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न, प्रत्येक क्षेत्रात आपण कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे कुंवर बासित अली म्हणाले.
एका आंदोलकाने सांगाड्याचे चित्र असलेला टी-शर्ट घातला होता तशाच प्रकारचे टी-शर्ट नेपाळ आणि इंडोनेशियातील विरोध प्रदर्शनांमध्ये दिसले होते, याकडे लक्ष वेधून कुंवर बासित अली म्हणाले की, या आंदोलनात प्रामुख्याने राहुल गांधी, दीपके, नेहा बोरा आणि इमरान असे चार चेहरे दिसतात. या सर्वांचे संबंध इटली, अमेरिका तर कोणाचे अन्य देशांशी आहेत. हे लोक कुठून संचालित होत आहेत, हे देशातील जनतेला माहीत आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करून आणि खोटी माहिती देऊन काही काळासाठी आंदोलनात सहभागी केले जाऊ शकते. मात्र, आपले विद्यार्थी आणि आपली मुले कधीही देशाविरोधात जाऊ शकत नाहीत. मोदीजी आणि भाजपा हे या देशाचे आत्मा आहेत. आम्ही देशाच्या आत्म्याशी जोडलेले राजकारण करतो. राष्ट्रवाद आणि अंत्योदयाची भावना आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. पैसे, अन्न किंवा कटकारस्थानांच्या माध्यमातून आम्ही कोणालाही या देशाला कमकुवत करू देणार नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांवर देशातील जनता लक्ष ठेवून आहे.
दिशाभूल करणाऱ्या शक्तींपासून तरुणांनी सावध रहावे
सध्या होत असलेल्या या आंदोलनामागील लोकांचे लोक संबंध कुठे ना कुठे परदेशाशी जोडलेले आहेत. या विरोध प्रदर्शनात सहभागी झालेले लोक स्वाभाविकपणे एकत्र आलेला समूह नसल्याचे दिसेल. लोकांना चिथावणी देऊन, चुकीची माहिती देऊन आणि संविधान तसेच अधिकारांच्या नावाखाली त्यांची दिशाभूल केली जात आहे. लोकांची दिशाभूल करून हे आंदोलन घडवून आणताना त्यांना देशाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही कुंवर बासित अली यांनी केली.
