खेड : तालुक्यातील तिसंगी येथील माजी सैनिक आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व कै. आप्पाजीराव भोसले यांचे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सातगाव परिसरातील सामाजिक व धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
कै. आप्पाजीराव भोसले यांचा जन्म २० डिसेंबर १९३२ रोजी तिसंगी येथे कै. आनंदराव भोसले यांच्या घरी झाला. ते आनंदराव यांचे द्वितीय सुपुत्र होते. वडिलांसोबत शेती व शेतीपूरक कामे करताना त्यांनी कणखर शरीरयष्टी कमावली होती. सहा फुटांहून अधिक उंची आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे समाजात त्यांची वेगळी छाप होती.
ऐन तारुण्यात त्यांची भारतीय सैन्याच्या ‘कॉर्प्स ऑफ सिग्नल्स’मध्ये निवड झाली. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर देशातील विविध सीमावर्ती भागांत त्यांनी सेवा बजावली. १९६२ मधील भारत-चीन युद्ध, १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध अशा देशाच्या इतिहासातील तीन महत्त्वाच्या युद्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. सुमारे २० वर्षे देशसेवा केल्यानंतर ते १९७५ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले आणि आपल्या मूळगावी परतले.
गावी परतल्यानंतर त्यांचे मोठे बंधू कॅप्टन भगवंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. तिसंगी आणि पंचक्रोशीतील सामाजिक व धार्मिक कार्यांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असत. तिसंगीचे ग्रामदैवत श्री केदार काळकाई यांचे ते निस्सीम भक्त होते. ग्राममंदिराच्या विकासात आणि कायापालटात त्यांचे मोठे योगदान होते.
सातगाव परिसरातील विविध गावांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत ‘श्रीराम ग्रामीण विकास मंडळा’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. मंडळाचे सल्लागार म्हणून त्यांनी पदाधिकारी आणि सदस्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. मंडळाच्या कार्यातही त्यांनी मोलाचे सहकार्य केले. समाजात ते ‘तात्या’ या नावाने परिचित होते.
त्यांच्या निधनाने सातगाव परिसरातील समाजाने एक अनुभवी, मार्गदर्शक आणि समाजकार्यात सदैव अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व गमावले आहे. कै. आप्पाजीराव भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
