खेड : पद्मश्री डॉ. के. एच. घरडा स्मृती सप्ताहानिमित्त घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (GITM), लवेल येथे विद्यार्थी प्रकल्प व नवोपक्रम प्रदर्शन २०२६ उत्साहात पार पडले. संस्थेच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप (IIIE) सेलच्या वतीने आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
जीआयटीएम चे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनात संस्थेतील विविध विभागांमधील ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, कार्यरत मॉडेल्स, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आणि विविध समस्यांवर आधारित व्यावहारिक उपाय सादर केले. या प्रदर्शनात एकूण १८ प्रकल्प मांडण्यात आले होते. प्रदर्शनातील प्रकल्पांचे मूल्यमापन नाविन्यता, तांत्रिक गुणवत्ता, व्यावहारिक उपयुक्तता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सादरीकरण या विविध निकषांच्या आधारे करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची, तांत्रिक ज्ञानाचे व्यावहारिक उपयोग सादर करण्याची आणि नाविन्यपूर्ण विचारांना चालना देण्याची संधी मिळाली. प्रदर्शनातील ‘LocalLens AI’ या प्रकल्पाने सर्वोत्कृष्ट प्रकल्पाचा (Overall Best Project) मान पटकावला. बी.ई. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AIML) विभागातील विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला होता. या विजेत्या संघात राजीव धीरेंद्र सिंह, निशांत महेंद्र ठाकरे, याया रावल आणि कृष्णकुमार गुप्ता यांचा समावेश होता. उत्कृष्ट कामगिरीबद्दल या संघाला ₹३,५०० रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विविध विभागांतील उत्कृष्ट प्रकल्पांना विभागीय पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभाला बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेलचे श्री. गोपाल थम्पी, जीआयटीएम चे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, IIIE फॅकल्टी समन्वयक डॉ. एस. डी. डोके आणि IIIE चे डीन डॉ. समीर एस. गजमल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे विद्यार्थी समन्वयक म्हणून GITM च्या बी.ई. केमिकल इंजिनिअरिंग विभागातील श्री. पृथ्वीराज गुजर यांनी जबाबदारी पार पाडली. IIIE सेल, IIC, शिक्षकवर्ग आणि सहभागी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे प्रदर्शन यशस्वीरीत्या संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनामुळे GITM मध्ये नवोपक्रम, संशोधन, उद्योजकता आणि व्यावहारिक समस्या सोडविण्याची संस्कृती विकसित होण्यास महत्त्वपूर्ण चालना मिळाली. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देतानाच भविष्यातील उद्योजक आणि नवसंशोधक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.