चिपळूण : शहराजवळील कळवंडे गावातील धरणातील पाणीसाठा आता जेमतेम ८% इतका शिल्लक राहिल्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती आणि भाजीपाला व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

चिपळूण शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कळवंडे येथून भाजीपाला विक्रीसाठी येतो. भातशेतीबरोबरच धरणाच्या पाण्यावर भाजीपाला पिकवला जातो. काकडी, दुधी, भोपळा, पडवळ, गावठी मिरच्या, भेंडी यांबरोबरच चिबूड यांसारखी उत्पादने घेतली जातात. वर्षभर गावातील पुरुष आणि महिला धरणाच्या पाण्यावर हा भाजीपाला पिकवतात. गावातील पुरुष मंडळी शेती करतात आणि महिलावर्ग या ताज्या टवटवीत भाज्या घेऊन चिपळूणच्या बाजारपेठेत दाखल होतो. त्यापैकी काही जणी भेंडीनाका, मध्यवर्ती बस स्थानक, पानगल्ली, शिवाजी चौक, भोगाळे अशा वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी बसतात. सोबत दुपारच्या जेवणाचा डबाही असतो. अडीचशे ते तीनशे महिला दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत बाजारपेठेत दाखल होतात आणि संध्याकाळी माल संपवून घरी परततात. या भाजीपाल्याबरोबरच अन्य हंगामी उत्पादनेही घेतली जातात. या महिलांचा उदरनिर्वाह या भाजीपाला विक्रीतूनच चालतो. प्रत्येकीला समाधानकारक पैसे मिळतात. आणि ही समाधानाची भावना घेऊन या महिला सायंकाळी उशिरा आपापली घरे गाठतात. कळवंडे गावाचा हा भाजीपाला अतिशय चविष्ट आणि आरोग्याला उपयुक्त असल्यामुळे बाजारपेठेत ग्राहक कळवंडेतून आलेला भाजीपाला ताबडतोब खरेदी करतात. त्यामुळे हळूहळू कळवंडे ब्रँड विकसित होऊ लागला आहे. आता कुठे या महिलांना सुखाचे दिवस येऊ लागले असताना त्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडावा, अशी परिस्थिती गावामध्ये निर्माण झाली आहे. हा भाजीपाला ज्या धरणाच्या पाण्यावर पिकवला जातो, त्या धरणात आता अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेमतेम १६% जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर धरणातील गाळाचा विचार केल्यास ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार धरणात केवळ ८% पाणीसाठा शिल्लक आहे.

या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांनी पाण्याअभावी आम्ही आता भाजीपाला कसा पिकवायचा, असा हताश प्रश्न उपस्थित केला आहे. चिपळूणच्या शिवाजी चौक भागात निर्मला नायरे, कविता भुर्णे, सरस्वती कारिटे या महिलांनी दैनिक ‘सागर’कडे आपली व्यथा मांडली. या महिला म्हणाल्या, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही धरणाच्या पाण्यावर भाजीपाला पिकवतो आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र, आता धरणात पाणीच नसल्यामुळे शेती आणि भाजीपाला कसा पिकवायचा, असा यक्षप्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. खरंतर धरणाच्या दुरुस्तीची काहीही गरज नव्हती. ती दुरुस्ती केल्यापासूनच धरणाला गळती सुरू झाली आहे आणि त्यामुळेच धरणाचा पाणीसाठा कमी होत आहे,” असा आरोप या महिलांनी केला. आता शेती पिकवता येणार नाही; मात्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी या महिलांनी केली.