पेण (प्रशांत पोतदार) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि ३१ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी निघालेल्या राष्ट्रीय एकता मोटारसायकल रॅलीचे पेण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल साई सहारा येथे स्वागत करण्यात आले. हॉटेलचे मालक तथा साई सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांनी सहभागी पोलिसांचे स्वागत केले.
केरळ, कर्नाटक, गोवा आणि लक्षद्वीप पोलीस दलातील एकूण ५७ मोटारसायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून व्यसनमुक्त भारताचा संदेश देणे हा या रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे जाणार आहे.
यावेळी पेणचे पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गर्जे, वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पेणमध्ये राष्ट्रीय एकता रॅलीचे स्वागत; ५७ पोलीस मोटारसायकलस्वारांचा सहभाग…
