चिपळूण : येथील संविधाननिष्ठ संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय बनो, भारत जोडो’ अभियानांतर्गत सामाजिक एकता परिषदेचे आयोजन रविवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे करण्यात आले आहे. या परिषदेला सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार संजय आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, चिपळूण शहर सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्यासाठी ओळखले जाते. वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेल्या या शहरात विविध जाती, धर्म, पंथ आणि राजकीय विचारांचे लोक अनेक वर्षांपासून सलोख्याने एकत्र नांदत आहेत. मतभेद असले तरी सामाजिक ऐक्याची परंपरा कायम राखली गेली असून, विविध सण-उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्व समाजघटक सहभागी होत असल्याने चिपळूणची ही ओळख अधिक दृढ झाली आहे.

भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये समाजजीवनात अधिक बळकट करण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना ठामपणे विरोध करत सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने या सामाजिक एकता परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या परिषदेला चिपळूण व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक बळकट करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे आयोजन संविधान सन्मान समिती, छत्रपती संभाजी ब्रिगेड, समता सैनिक दल, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचारमंच, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्र सेवा दल, पूज्य गांधी प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा, चिपळूण मुस्लिम समाज संघटना, बौद्धजन पंचायत समिती, सत्यशोधक शिव प्रवर्तक समिती, अंजुमन दर्दमंदाने, बौद्धजन उत्कर्ष समिती, कोकण सिरत कमिटी, ओबीसी संघर्ष समिती, दिव्यांग सेवा संस्था, मुस्लिम समाज विकास संघ, चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षण समिती, कोकण कन्या फाउंडेशन, यशसिद्धी माजी सैनिक संघ, जमीयत उलेमा चिपळूण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही चिपळूणकर या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.