ठाणे : “सरकार, सांगा कसं जगायचं?” असा सवाल उपस्थित करत श्रमजीवी संघटनेच्या वतीने येत्या २७ ऑक्टोबरला मुंबईत ‘संविधान हक्क संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. आदिवासी आणि वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून, एक लाखाहून अधिक आदिवासी बांधव मंत्रालयावर पायी धडकणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

वनजमिनीचे प्रलंबित दावे, घरांच्या नोंदी, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कामगारांचे प्रश्न अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि रायगड जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरला मुंबईत आदिवासींच्या हक्कांसाठीचा हा लढा किती तीव्र होणार, याकडे लक्ष लागलं आहे.