देवरुख : लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे नेतृत्व, शांत व संयमी स्वभाव आणि विकासकामांबाबतची सकारात्मक कार्यपद्धती यांवर विश्वास व्यक्त करत देवरुख येथील तेलीवाडीच्या ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गटात) जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात सावर्डे येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी सर्व ग्रामस्थांचे स्वागत करून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.

पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आमदार निकम यांनी तेलीवाडीतील विकासकामांचा आढावा घेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रलंबित व उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याची त्यांची भूमिका आणि प्रत्येकाशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

“नेतृत्व केवळ आश्वासनांतून नव्हे, तर संवादातून, कामातून आणि विश्वासातून उभे राहते,” याचा प्रत्यय या संवादातून आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार शेखर निकम यांचा शांत, संयमी स्वभाव, बोलण्यातील आपुलकी आणि काम करण्याची पद्धत पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, “आम्ही सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“जनतेचा विश्वास हीच माझ्या कामाची खरी ताकद!”
यावेळी आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “राजकारणात पदापेक्षा माणसांनी दिलेला विश्वास आणि प्रेम माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. तेलीवाडीच्या ग्रामस्थांनी माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून माझ्यासोबत येण्याचा निर्णय घेतला, ही माझ्यासाठी आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे. जनतेने दाखविलेला विश्वास हीच माझ्या कामाची खरी ताकद आहे.

आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा, प्रत्येक सामान्य माणसाच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. विकासकामे करताना कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे, हीच माझी भूमिका आहे. आपण सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आपल्या सुख-दुःखात आणि प्रत्येक अडचणीत मी सदैव आपल्या सोबत असेन,” असे भावनिक मनोगत आमदार निकम यांनी व्यक्त केले.

या पक्षप्रवेशातून आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास आणि त्यांच्याशी निर्माण झालेली आपुलकी अधोरेखित झाली. जनतेशी जपलेले नाते, विकासकामांची तळमळ आणि विश्वासाच्या बळावर पुढे जाणारे नेतृत्व, अशी भावना या प्रसंगातून व्यक्त झाली.

यावेळी अरुण किर्वे, रजनीकांत किर्वे, शत्रुघ्न मोरे, शिवराम किर्वे, मधुकर किर्वे, रविंद्र किर्वे, सुधाकर किर्वे, सुनील किर्वे, प्रवीण किर्वे, रोहित किर्वे आणि शिवाजी वहाळकर या प्रमुख ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी नगरसेवक यशवंत गोपाळ, आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, शहराध्यक्ष हनिफशेठ हरचिरकर, बाळू ढवळे, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, माजी युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, शहर युवक अध्यक्ष रविंद्र लाड, तालुका युवक अध्यक्ष प्रतीक साळवी, अमित जाधव, बंडू जाधव, मंगेश कदम, प्रतीक जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.