लोटे : केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय आणि राज्य शासनाच्या कामगार विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवीन कामगार संहितेबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत उद्या, शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी जिल्हास्तरीय ‘श्रमसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोटे येथील उद्योग भवन, पी-४० येथे दुपारी १२ ते सायंकाळी ४.३० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. नवीन कामगार संहितेची प्रभावी अंमलबजावणी, त्यातील तरतुदी, कामगारांचे हक्क आणि औद्योगिक आस्थापनांच्या जबाबदाऱ्या याबाबत या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक उपस्थित राहणार असून, ते उद्योजक, औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित घटकांना नवीन कामगार संहितेबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील घटकांना नव्या कायदेशीर तरतुदी समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक तसेच इतर आस्थापनांच्या प्रतिनिधींनी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.