मंडणगड : पतीच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त दुःखाला विधायक कार्याची जोड देत निवृत्त मुख्याध्यापिका मधुरा बेंदरकर यांनी लोटे घाणेकुंट येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आपल्या पती कै. मकरंद बेंदरकर यांचा स्मृतिदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमातून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

आपल्या आयुष्यातील जवळची व्यक्ती, विशेषतः जीवनसाथी कायमचा सोडून गेल्याचे दुःख डोंगराएवढे असते. अशा दुःखद प्रसंगालाही सकारात्मकतेची जोड देत मधुरा बेंदरकर यांनी पतीच्या स्मृती विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्राशी, समाजाशी आणि आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांशी असलेले नाते त्यांनी या कृतीतून जपले आहे.

शिक्षक म्हणून कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची घेतलेली काळजी निवृत्तीनंतरही कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शिक्षण, समाज आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आपुलकी व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाले.

या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी खरात, ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल पाष्टे,सौ. ममता जोशी, उपशिक्षिका अनुराधा मकोटे, सौ. शिगवण, महिला पालक सौ. पडवळ, सौ. मोरे, आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पतीच्या स्मृती जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणाऱ्या मधुरा बेंदरकर यांच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

फोटो ओळ : पती कै. मकरंद बेंदरकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना निवृत्त मुख्याध्यापिका मधुरा बेंदरकर व अन्य मान्यवर.