दापोली : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील एस.वाय.बी.कॉम. चा विद्यार्थी आयुष नयनेश मुलुख याने पाश्चात्य एकल वादन या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट वादनाने रजतपदकाची कमाई करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, सांताक्रूझ, मुंबई येथे झालेल्या अंतिम फेरीत त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

विशेष म्हणजे, या स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाच्या इतिहासातील अंतिम फेरीतील हे पहिलेच पदक आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व असलेल्या या स्पर्धेत दापोली तालुक्यातील चंद्रनगरसारख्या ग्रामीण भागातून येऊन शिक्षण घेणाऱ्या आयुषने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले.

आयुषला या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. कैलास गांधी व संगीत विभाग समन्वयक प्रा. अनिरुद्ध सुतार यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रा. अजिंक्य मुलुख यांनी संघव्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली.

आयुषच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर आणि इतर सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनशाम साठे तसेच मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव उत्तर रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. संतोष मराठे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.