रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत नाव आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, राम कुलकर्णी यांनी केले आहे.
सदर पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय व सचिव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे ‘अॅग्रीस्टॅक नोंदणी’ (फार्मर आयडी) क्रमांक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी तात्काळ नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन ही नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी स्वतः आपल्या जवळील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘महा ई-सेवा केंद्र’ येथे उपस्थित राहून बायोमेट्रिक किंवा आवश्यक प्रक्रियेद्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्रांच्या चालकांसाठी या प्रक्रियेबाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण जिल्हा प्रकल्प कार्यालय, महाआयटी, रत्नागिरी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. यासंबंधीची सविस्तर कार्यपद्धती जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्र आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.