दापोली (प्रतिनिधी:सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही’ गटाच्या वतीने वणौशी तर्फ पंचनदी येथे शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला.
शेतकऱ्यांमध्ये कीटकनाशकांचा सुरक्षित व योग्य वापर, साठवणूक आणि फवारणीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कीड ओळखल्यानंतरच योग्य कीटकनाशकाची निवड करणे, उत्पादनाच्या लेबलवरील सूचना वाचणे आणि विषारीपणाच्या रंगपट्ट्या समजून घेणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रात्यक्षिकातील महत्त्वाचे मार्गदर्शन:
सुरक्षा साधने (PPE Kit): फवारणी करताना हातमोजे, मास्क, गॉगल्स, पूर्ण बाह्यांचे कपडे, अॅप्रन व गमबूट यांसारख्या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
द्रावण तयार करणे: कीटकनाशक मोजताना व मिसळताना शिफारशीनुसार योग्य प्रमाणाचा वापर करणे, जास्त मात्रा टाळणे आणि योग्य शिफारशीशिवाय रसायने एकत्र न मिसळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
फवारणीची योग्य वेळ व पद्धत: फवारणीपूर्वी यंत्र व नोजलची गळती तपासणे आवश्यक आहे. फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी, वाऱ्याचा वेग कमी असताना करावी. जोरदार वारा किंवा पावसाच्या वेळी फवारणी टाळावी.
खबरदारी व स्वच्छता: फवारणीदरम्यान खाणे, पिणे किंवा धूम्रपान करू नये. फवारणीचा फवारा माणसे, जनावरे, घरे व पाण्याच्या स्रोतांकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी. काम झाल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुऊन स्नान करावे आणि साधने स्वच्छ करावीत.
साठवणूक व पर्यावरण रक्षण: कीटकनाशके मूळ डब्यातच लहान मुले, जनावरे व अन्नापासून दूर ठेवावीत. रिकाम्या डब्यांचा घरात पुनर्वापर करू नये. तसेच मधमाश्या व उपयुक्त कीटकांच्या संरक्षणासाठी विनाकारण फवारणी टाळावी.
सहभाग व मार्गदर्शन:
या प्रात्यक्षिकाच्या आयोजनामध्ये कृषी स्नेही गटातील समृद्धी जाधव, आकांक्षा गाडगे, श्रावणी मोरे, तन्वी नादिवडेकर, नीलम मदने, कोमल झिरवाळ, श्रुती बोबडे, अंकिता मुंज, सलोनी सावंत व साक्षी लोके या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
वणौशी येथे कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराचे धडे..
