खेड : कुळवंडी-वडाचीवाडीचे सुपुत्र तथा मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्यात अजय तोडकरी यांच्या वतीने गांधी यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रसाद गांधी हे रक्तदान, अपघातग्रस्तांना तातडीने मदत, आपत्कालीन रुग्णसेवा तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देत आहेत. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत करण्यात आलेला हा सन्मान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरला.या सोहळ्याला खेड शहराध्यक्ष नंदू साळवी, संभाजी देवकाते सर, विनायक शिरगावकर, अजय तोडकरी, प्रसिद्ध गायक कृष्ण वीर गुजर आणि मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अजय तोडकरी हे भाजप खेड तालुक्याचे माजी सरचिटणीस तथा उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे कार्य करणाऱ्या प्रसाद गांधी यांचा गौरव कुळवंडी-वडाचीवाडी परिसरासाठी अभिमानाची बाब ठरला आहे. या सन्मानामुळे त्यांना भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.