खेड : खेड-दापोली मुख्य रस्त्यावरून दापोलीच्या दिशेने मच्छी (कुटी) वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेनेचे खेड शहरप्रमुख कुंदन नागेश सातपुते यांनी संबंधित वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकारी, खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, खेड-दापोली मुख्य रस्त्यावरून मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्या भरलेल्या अवस्थेत दापोलीच्या दिशेने जात असतात. या गाड्यांमध्ये मच्छी वाहतुकीदरम्यान निर्माण होणारे दुर्गंधीयुक्त पाणी साठवण्यासाठी स्टोरेज टँक बसविण्यात आलेले असतात. मात्र, या टँकमधील पाण्याचे पाइप सर्रासपणे बाहेर सोडण्यात येत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर सांडत आहे. परिणामी, मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरत असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त पाणी सोडणे हा नागरिकांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित वाहनांची तपासणी करून दोषी वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुंदन सातपुते यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच नागरिकांना सोबत घेऊन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.