खेड : नवरात्रीमध्ये देवीच्या उत्सवाचा जागर केला जातो. देवीची आराधना केली जाते. सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. याच उत्सवा दरम्यान चतुरंग विचार मंच खेड रत्नागिरी यांच्या वतीने अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला.
खेड तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षकांचा नवदुर्गा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सर्वच महिला आपले काम करत असतात मात्र नवरात्रीमध्ये परतून स्वरूपात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान करण्याचे हे चतुरंगचे २ रे वर्ष आहे. या वर्षी दीप्ती दिलीप यादव शाळा – माणी नं.1, सविता माणिक सुतार – चिंचघर मेटकर डाऊल, मीनल मोहन कदम – शाळा कळंबणी नं.२, मीनल खेडेकर शाळा – सुकदर, माधुरी प्रशांत खेडेकर शाळा – जामगे शिंदे, तृप्ती घोटणे शाळा – कोतवली नं.२, प्रतिभा देशमाने, सई संदेश म्हापदी – शाळा साखर नं.२, या शिक्षकांचा शाल श्रीफळ मानचिन्ह सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आणि प्रसिद्धी पासून अलिप्त राहून आपली सेवा बजावणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान करून चतुरंगने अनोख्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, नासा, इस्रो चाचणी परीक्षा, बीडीएस, मंथन अशा स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करून त्यांना गुणवत्ता यादीत आणणे, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना केस करणे, शैक्षणिक उठावातून शाळेच्या गरजा पूर्ण करणे, शाळेमध्ये कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण विषयाचे उपक्रम राबविणे तसेच क्षेत्रभेट आयोजित करणे, शैक्षणिक सहली, विविध प्रकारच्या चित्रकला, वक्तृत्व, निबंध, रांगोळी, भोंडला अशा स्पर्धा आयोजित करणे, परसबाग निर्मिती करणे, व्हिडिओ निर्मिती करणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे, मासिक पाळी व्यवस्थापन, विविध प्रकारचे प्रशिक्षणे घेणे आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणे अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले यासाठी चतुरंग विचार मंचचे परेश खोपडे,दिनेश पवार, मंगेश झावरे, राहुल तुगांवकर यांनी विशेष सहकार्य केले.