राजापूर : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजापूर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘शोध नवमूर्ती कलाकारांचा’ या अभिनव संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी राजापूर हायस्कूल कलामंदिर येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते, सचिव मा. श्री. विनायकजी राऊत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांची असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा विचार नव्या पिढीमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध संकल्पना आणि कलात्मक कौशल्यातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. छोट्या गटात दुर्वा पराडकर, शुभ्र पाटकर आणि चिरायू कुळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात आदित्य मांडवकर, वरद् रहाटे आणि तनिष्क गुरव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख रविंद्र डोळस, तालुका प्रमुख कमलाकर कदम, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुका प्रमुख अनाजी गोटम, अभिजित तेली, युवासेना उपजिल्हा संतोष हातणकर, तालुका अधिकारी सुभाष नवाळे, शिवसहकार तालुका संघटक प्रभाकर कानडे, विभाग प्रमुख रुपेश नारकर, विलास नारकर, शांताराम तळवडेकर, नरेश शेलार, मा. शहर प्रमुख अनिल कुडाळी, विभाग अधिकारी अमित मोंडे, शहर संपर्क प्रमुख सत्यवान कदम, विभागसंघटक स्नेहा उगले, धनश्री मांजरेकर, शहर युवती प्रतीक्षा मांजरेकर, उपशहर युवती गार्गी चिपटे, उपविभाग प्रमुख विठोबा हर्याण, नामदेव नागरेकर, मंगेश पराडकर, किरण बेर्डे सर, सरपंच राजू सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.