मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल अतिशय आक्षेपार्ह आणि अभद्र भाषेत केलेल्या टीकेतील शब्द त्यांचे नाहीत तर खुद्द राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत. नरेंद्र मोदीजींच्या वडिलांना उद्देशून अपशब्द वापरण्याची, मोदीजींना शिव्या देण्याची परंपरा काँग्रेसची आहे. परंतु, ‘गाली को गहना बनाना मेरी आदत है, क्योंकी तलवार की नोक पे चलनेवाला मैं इंसान हूँ’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना काँग्रेसने कितीही शिव्याशाप दिले तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही. देशाच्या विकासाची महायात्रा अखंडितपणे सुरूच राहणार आहे, असा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशातील 140 कोटी जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरायचे, त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत अपमान करण्याची परंपरा काँग्रेसने या देशात जन्माला घातली आहे. ‘मौत का सौदागर’, ‘खून की नदियाँ बहानेवाले’ असा उल्लेख असेल किंवा मोदीजींच्या आईबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींच्या सांगण्यावरून पंतप्रधानांच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरण्याची काँग्रेसच्या लोकांना लाज वाटली पाहिजे. जनतेने आपल्याला नाकारल्याचे नैराश्य काँग्रेसला आहे. कारण काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, एसआयआरबद्दल, निवडणुकीसंदर्भात आक्षेप घेऊन काही फरक पडला नसल्याने आता मोदीजींना शिव्या देऊन आपल्याला सत्ता मिळेल, अशा भ्रमात ते असतील तर तसे अजिबात होणार नाही, असे श्री. बन यांनी निक्षून सांगितले.
श्री. बन पुढे म्हणाले, धक्कादायक बाब म्हणजे काल ज्या व्यक्तीसमोर काँग्रेसने शिवीगाळ केली, तो काँग्रेसचाच कार्यकर्ता होता. तो भाजपाचा कार्यकर्ता असेल असे वाटल्याने काँग्रेसच्या लोकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यालाच मारहाण केली. ते सभागृह 50 टक्केही भरलेले नव्हते. रिकाम्या खुर्च्या पाहून मल्लिकार्जुन खरगे यांना नैराश्य आले असेल.
अभिनेते नसरुद्दीन शाह सुरुवातीपासूनच डाव्यांची भूमिका बजावतात. पण त्यांचाच एक प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘जब कॉक्रोच घर में आता है, तो उसको चप्पल से कुचलना पड़ता है.’ या देशातील जनता सुज्ञ आहे. असे जे काही कॉक्रोच काँग्रेसच्या माध्यमातून विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभी असलेली 140 कोटी जनता त्याचा योग्यवेळी हिशेब करेल, असे श्री. बन यांनी सुनावले.
राहुल आणि सोनिया गांधी हेच मल्लिकार्जुन खरगे यांचे बोलविते धनी; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार…
