दापोली : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ३६ अन्वये लेखा विवरणपत्रे (हिशोबपत्रके) ऑनलाइन जमा करणाऱ्या विश्वस्त संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन हिशोबपत्रके दाखल केल्यानंतर त्यांची पोहोच पावती संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जमा करण्याची सक्ती बंद करण्याचे निर्देश राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.
धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून ५ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यापूर्वीच्या परिपत्रकानुसार न्यायालयीन व इतर संबंधित कार्यवाहीत हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ऑनलाइन हिशोबपत्रके दाखल करण्यासाठी संस्थांना यूजर आयडी उपलब्ध करून देण्यात आले होते.
मात्र, ऑनलाइन हिशोबपत्रके दाखल केल्यानंतर त्यांची पोहोच पावती संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयात प्रत्यक्ष जमा करण्याची प्रथा सुरू होती. ही पावती प्रत्यक्ष सादर करण्यासाठी स्वतंत्र सूचना किंवा परिपत्रक जारी करण्यात आलेले नसतानाही ही पद्धत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विश्वस्त संस्थांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ऑनलाइन हिशोबपत्रके दाखल केल्यानंतर त्यांची पोहोच पावती प्रत्यक्ष कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विश्वस्त संस्थांकडून अशा प्रकारे पोहोच पावतीची प्रत्यक्ष मागणी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील विश्वस्त संस्थांना हिशोबपत्रके दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, अनावश्यक कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा मिळणार आहे. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकाची नोंद घेऊन त्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.