रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याचे वितरण शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातही लाभार्थी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी सुमारे १ लाख ५५ हजार ९४३ शेतकऱ्यांना २४ व्या हप्त्याचा लाभ मिळणार असून, त्यासाठी अंदाजे ३१ कोटी ४४ लाख रुपयांचे वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली आहे.

या कार्यक्रमानिमित्त जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देणे, विविध कृषी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि कृषीविषयक मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.