रोहा : मुख्य जल वाहिनी तपासणी,देखभाल व दुरुस्ती तसेच इतर आवश्यक तांत्रिक कामासाठी रोहा एमआयडीसी प्रशासनाने येथील सर्व कारखान्यांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून आज ( शुक्रवार) पासून सलग दोन दिवस संपूर्ण एमआयडीसी परिसरात पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व कंपनीतील उत्पादन प्रक्रियेवर गंभीर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जवळपास असंख्य ग्राम पंचायत हद्दीतील ३२ गावे असंख्य वाड्या वस्त्यांना देखील या ‘शट डाऊन’चा फटका बसणार असल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर पाणी पुरवठा खंडित होणार असल्याने ग्रामस्थांना विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे उपलब्ध जल साठ्याचे काट कसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने करण्या बाबत कोलाड पाटबंधारे प्रशासना कडून रोहा एमआयडीसी प्रशासना कडून लेखी पत्राद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रोहा अंतर्गत आज पासून दोन दिवसीय ‘शट डाऊन’ घोषित करण्यात आला आहे.या दरम्यान पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीची तपासणी,देखभाल व दुरुस्ती तसेच इतर आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाआहे.या अनुषंगाने रोहे एमआयडीसी कडून दि.३०ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्या पासून शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजे पर्यंत एकूण ३६ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तरी सर्व कारखानदार व ग्राम पंचायतींनी सदर सूचनेची नोंद घ्यावी असे आवाहन एमआयडीसी महामंडळा कडून करण्यात आले आहे. दरम्यान, या पाणी टंचाईमुळे बहुतांश गावकऱ्यांवर खाजगी टँकरदने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
या विषयी रोहा एमआयडीसी प्रशासना कडून पनवेल येथील दिघी प्रकल्प विभाग कार्यालय,रोहा तहसील कार्यालय,कंपनी व्यवस्थापक अधिकारी, संबधित ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना लेखी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत..
या गावांचा पाणी पुरवठा खंडित..
एमआयडीसी कडून घेण्यात आलेल्या शट डाऊनमुळे ग्रा.पं.धाटाव, रोठ बुद्रुक,रोठ खुर्द,वरसे,वाशी,लांढर मलखंडवाडी, तळाघर, बोरघर,पिंगळसई त्याचप्रमाणे २६ गाव पाणीपुरवठा योजना अंतर्गत आलेल्या पडम, खारापटी, निडी, झोळंबे, कोपरे, भातसई, यशवंतखार,लक्ष्मीखार, सानेगाव,खारी,खारगाव, आरे खुर्द,आरे बुद्रुक, गोफण,भागीरथीखार आदी प्रमुख गावे आणि असंख्य वाड्या वस्त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे..
जल वाहिनी तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रोहा एमआयडीसी कडून आज पासून सलग दोन दिवस जवळपास ३० गावे व २० वाड्या वस्त्यां वरील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जल वाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून ३६ तासाच्या आत काम पूर्ण होईल अशी उमेद आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र ग्रामस्थांनी उपलब्ध पाण्याचा काट कसरीने वापर करून एमआयडीसी प्रशासनाला सहकार्य करावे