मुंबई : भाजपा आणि शिवसेनेच्या महायुतीबाबत सुरु असलेल्या चर्चेत रवींद्र धंगेकर हे भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आपले राजकीय करिअर घडवण्यासाठी 12 पक्ष फिरून शेवटी शिवसेनेत प्रवेश करून आपला माकडछाप ब्रँड पुणेकरांना दाखवून दिला त्या व्यक्तीला पुणेकरांनी लोकसभा आणि विधानसभेलाही घरी बसवले. एवढेच नाही, तर पुणे महापालिकेच्या निवडणूकीत या व्यक्तीच्या कुटुंबातील दोघांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम पुणेकरांनी केले. ज्याचा ब्रँडच माकडछाप आहे, त्याची अवस्था ‘माकडाच्या हाती कोलीत’ अशी झाली आहे. बारा घरची धुणी भांडी करूनही आपले करिअर सेट करू शकले नाहीत, अशांनी भाजपाला शहाणपणा शिकवू नये, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माझ्या पाठीमागे कमळ आहे; पण धंगेकरांच्या पाठीमागे पंजाचा हात होता, पूर्वी त्यांच्या पाठीमागे रेल्वे इंजिन होते, आता धंगेकरांच्या पाठीमागे धनुष्यबाण आहे. उद्या पुन्हा त्यांच्यामागे पाठीमागे शिट्टी येईल, कारण धंगेकरांना एकाही पक्षाने किंमत दिली नव्हती. सुरुवातीला मनसे, काँग्रेस, शिवसेना, मग कधी उबाठा तर कधी आणखी कुठे जाल? मी तुमच्यासारखे 12 पक्ष बदललेले नाहीत. 12 घरची धुणीभांडी केलेली नाहीत. तुमच्यासारखे 12 चिन्हे, 12 पक्ष आणि 12 घरे फिरून आपले करिअर सेट करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. त्यामुळे माकडछाप व्यक्तींना फार महत्त्व देऊ नये, अशी अपेक्षा श्री. बन यांनी व्यक्त केली.
श्री. बन पुढे म्हणाले, महायुती आलबेल राहावी, हा आमचा प्रयत्न आहे. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार या तिन्ही नेत्यांनी महायुती वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु त्यांचे काही खालचे कच्चेबच्चे महायुतीत दरार निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, भाजपाच्या उमेदवारालाच पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर भाजपाचा एक साधा कार्यकर्ता म्हणून मला जे वाटले, ते मी त्यांना विचारले. त्यांनी उत्तर द्यावे. उत्तर द्यायचे नसेल, तर आम्ही यांना उत्तर देणार नाही, असे सांगावे. तुमचा पदाधिकारी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकत असताना त्याबद्दल पक्षाची भूमिका आहे की नाही, याचे साधे उत्तर देणे अपेक्षित आहे.
अमरावतीतील बंडखोरांना आम्ही एक-दोन नाही तर तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित केले. आता माझा बच्चू कडूंना सवाल आहे की, अमरावतीमध्ये आम्ही कारवाई केली, तशी कारवाई तुम्ही पुण्यामध्ये महायुतीविरोधात काम करणाऱ्यांवर करणार आहात का? छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करणार आहात का? कारण ते उघडपणे मान्य करतात की, होय, आम्ही महायुतीच्या विरोधात काम केले. मग अशांवर कारवाई होणार आहे की नाही? कारण महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांना वेळीच रोखले पाहिजे. तर महायुती अभेद्य राहील, असे मत श्री. बन यांनी मांडले.
धंगेकर, सत्तार बोलतात तीच तुमची भूमिका आहे का ?
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फक्त एवढेच विचारले की, रवींद्र धंगेकर बोलतात ती भूमिका शिवसेनेची आहे का? अब्दुल सत्तार बोलतात, ती भूमिका शिवसेनेची आहे का? या प्रश्नाचे साधे, सरळ आणि सोपे उत्तर शिवसेनेकडून अपेक्षित आहे. काल भाजपा उमेदवाराबद्दल रवींद्र धंगेकरांनी खंडणीखोरांपासून इतर अनेक अपशब्दांचा वापर केला. या शब्दांशी माननीय एकनाथजी शिंदे, शिवसेनेचे वरिष्ठ नेते सहमत आहेत का? हा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर शिवसेनेने द्यायला हवे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असे श्री. बन म्हणाले.
