पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज काढले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा उत्सव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, गुणवत्ता आणि कठोर परिश्रमाच्या बळावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सारथीची भक्कम साथ आहे असेही सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या.
