पंढरपूर : आमदार रोहित पवार आज पंढरपूरमध्ये दाखल झाले असून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी संत गाडगे महाराज मठातून आंदोलनस्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तसेच विठ्ठल भक्तीची परंपरा जपत संत नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार आंदोलनाला औपचारिक सुरुवात करणार आहेत.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.