मंडणगड : तालुक्यातील दोन पिढ्यांच्या प्रवासाची, संघर्षाची आणि असंख्य आठवणींची साक्षीदार असलेली मंडणगड शहरातील एस.टी. बसस्थानकाची जुनी इमारत अखेर काळाच्या पडद्याआड गेली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जुन्या इमारतीचो पाडकामानंतर ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळ तालुकावासीयांच्या सेवेत असलेल्या या वास्तूच्या जागी आता पाच कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक स्वरूपाचे नवे बसस्थानक उभे राहणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पुढाकारातून मंडणगड तालुक्यात विविध विकासकामांना चालना मिळाली. याच विकासप्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एस.टी. बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली. त्यानंतर या बसस्थानकाने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि मुंबई-पुण्याकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
गेल्या ४३ वर्षांच्या कालखंडात या इमारतीने अनेक बदल अनुभवले. जुन्या पिढीचा ग्रामीण भागातून शहराकडे होणारा प्रवास, शिक्षणासाठी बाहेर पडणारे विद्यार्थी, रोजगाराच्या शोधात मुंबई-पुण्याकडे जाणारे तरुण, सण-उत्सवासाठी गावी परतणारे चाकरमानी अशा असंख्य प्रवासांच्या आठवणी या वास्तूशी जोडल्या गेल्या आहेत. अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात याच बसस्थानकातून झाली. त्यामुळे ही केवळ एसटीची इमारत नव्हती, तर मंडणगडच्या सामाजिक आणि प्रवासी जीवनाचा अविभाज्य भाग होती.
काळाच्या ओघात जुन्या इमारतीची जागा नव्या विकासाला देण्याची वेळ आली आहे. जुन्या वास्तूचे पाडकाम पूर्ण झाल्याने आता या ठिकाणी नव्या बसस्थानकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पाच कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचे नियोजन असून, नव्या वास्तूमुळे मंडणगडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जुनी वास्तू इतिहासजमा झाली, मात्र तिच्याशी जोडलेल्या दोन पिढ्यांच्या आठवणी कायम राहणार आहेत. एका बाजूला जुन्या बसस्थानकाच्या आठवणींना निरोप, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक बसस्थानकाच्या नव्या पर्वाची प्रतीक्षा, अशा वळणावर मंडणगड शहर उभे आहे.
जुन्या वास्तूचा प्रवास संपला; आता नव्या बसस्थानकातून मंडणगडच्या विकासाच्या प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.
दोन पिढ्यांच्या आठवणींचे साक्षीदार एस.टी. बसस्थानक जमीनदोस्त!
