नांदेड : भाजप असो किंवा काँग्रेस, सत्तेच्या राजकारणामागील जातीय आणि सामाजिक समीकरणे समजून घेणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या पक्षाला विरोध करणे म्हणजे जातिव्यवस्थेला विरोध करणे नव्हे. Anti-BJP असणे म्हणजे Anti-Caste असणे नाही. पक्षीय राजकारणाला विरोध आणि जातिव्यवस्थेविरोधातील लढा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हा मूलभूत फरक आजच्या Gen Z पिढीने समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
औरंगाबादनंतर नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जय भीम Gen Z’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सुजात आंबेडकर यांनी तरुणांशी संवाद साधत राजकारण, जातीय वास्तव आणि स्वतंत्र वैचारिक नेतृत्वाची गरज यावर आपली भूमिका मांडली. आजची Gen Z पिढीसुद्धा जातीय आधारावर विभागली गेली आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या तरुणांनी राजकीय आणि जातीय वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
राजकीय पक्षांच्या भूमिकांमागील सामाजिक आणि जातीय समीकरणे समजून घेण्याची क्षमता तरुणांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्याही राजकीय अजेंड्याचे प्यादे बनणार नाही. आमची स्वतंत्र वैचारिक ओळख निर्माण करू, आमची एकजूट, आमची ताकद आणि आमचे नेतृत्व आम्ही स्वतः उभे करू, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.
आमच्या पिढीची कथा आम्ही स्वतः लिहिणार आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांनी कोणत्याही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली न जाता स्वतःची वैचारिक भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात तरुणांनी स्वतंत्रपणे विचार करून संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘जय भीम Gen Z’ या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये वैचारिक जागृती, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि स्वतंत्र नेतृत्वाची उभारणी करण्याचा संदेश सुजात आंबेडकर यांनी दिला. औरंगाबादनंतर नांदेड येथे पार पडलेल्या या दुसऱ्या टप्प्यात तरुणांशी संवाद साधत त्यांनी नव्या पिढीसमोर राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा मांडली.
जय भीम Gen- Z या कार्यमाला तरुण – तरुणींनी तुफान गर्दी केली होती. औरंगाबाद नंतर झालेल्या या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात फुले – शाहू – आंबेडकर विचारधारा असणाऱ्या GenZ तरुण – तरुणींनी सभागृह हाऊसफुल केले होते. जय भीम GenZ या कार्यक्रमाला दुसऱ्या टप्प्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. GenZ तरुण – तरुणी फुले – शाहू – आंबेडकरवादी विचारधारेकडे आकर्षित होताना दिसत आहे.
