मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीत लाखो लोक सहभागी झाल्याचा दावा करत त्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीतील रामलीला मैदानावर उसळलेला जनसागर मतचोरांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही. या आंदोलनाची जाणीव झाल्याने मतचोरीच्या जोरावर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, ते बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत साबरमतीच्या काठावर झोके घेतले होते. त्यावेळी चीनकडून त्यांना फंडिंग झाले होते का, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील अडीच कोटी मृत मतदारांची नावे एसआयआरमधून वगळण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असून, कोणतीही वस्तुस्थिती तपासल्याशिवाय ते खोटे बोलत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. तसेच, काँग्रेस पक्षाने एकही बीएलए (BLA) नियुक्त केला नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा धादांत खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती घेतली असती, तर काँग्रेसचे तब्बल ५६ हजार बीएलए कार्यरत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले असते, असेही त्यांनी नमूद केले.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबतचे खोटे ट्विट डिलीट करण्याची वेळ फडणवीसांवर आली होती. त्याचप्रमाणे आजच्या भाषणातील बिनबुडाचे आरोपही त्यांना मागे घ्यावे लागतील, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.