दापोलीः- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात म्हणजेच स्वगृही परतणारे श्री मुजीब रूमाणे हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले कार्यकर्ते असून स्वतःला झालेल्या दुर्धर आजारावर मात करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुन्हा ते जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत. आज ते आणि त्यांचे असंख्य समर्थक हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असून प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण त्यांचे स्वागत करीत असून आता दापोली मतदार संघामध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण ताकद निर्माण करायची असून राष्ट्रवादी पक्षाला घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला येथून पुढे तालुक्यात राजकारण करता येणार नाही असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील खासदार सुनिल तटकरे यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली विधानसभा संपर्कप्रमुख श्री. मुजीब रूमाणे यांनी आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची सावंतवाडीपासून ते रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघामध्ये काही वर्षापूर्वा एक ताकद निर्माण झाली होती. बदलत्या काळामध्ये ही ताकद कमी झाली असून आपण पुन्हा या मतदार संघांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दापोलीतील विविध विकासकामांना आपण निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही मागणीप्रमाणे निधी विविध माध्यमातून विकासकामांसाठी दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रवेशकर्ते श्री. मुजीब रूमाणे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्याने प्रवेश करत नसून आपल्या जुन्या घरी परतत असल्याची भावना व्यक्त करतानाच यापूर्वी पक्षामध्ये केलेल्या कामाचा व जुन्या सहकाऱ्यांचा उल्लेख केला. व पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आपल्या पक्षप्रवेशामुळे उध्दव ठाकरे पक्षाला चिंता वाटायच्या ऐवजी अन्य पक्षांना चिंता वाटू लागली असून यातच आपला विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दापोली शहर, केळशी, हर्णै, पांगारी येथील विविध कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रदेश सरचिटणीस अजय बिरवटकर, दापोली तालुकाध्यक्ष जयवंत जालगावंकर, मंडणगड तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम, ज्येष्ठ नेते भाई पोस्टुरे, महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, मंडणगड नगराध्यक्षा सोनल बेर्डे, युवती तालुकाध्यक्ष पुजा नागवेकर, युवक तालुकाध्यक्ष युवराज जाधव, अर्बन बँकेचे संचालक संदीप दिवेकर, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही यापुढे दापोलीत राजकारण करता येणार नाही -खासदार सुनिल तटकरे
