चिपळूण (विशेष प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत धनशक्तीचा इतका बेसुमार वापर झाला की काही विचारू नका. मात्र या विरोधात जनशक्ती एकवटून आपण लढलो आणि त्यामध्ये जनतेने जो कौल दिला तो मान्य करून पुन्हा संघर्ष योद्धाप्रमाणे नव्या उमेदीने आणि ऊर्जेने संघटना नव्याने बळकट करण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत अशी वीरश्रीयुक्त गर्जना आमदार भास्करशेठ जाधव यांनी येथे केली.

विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नामुळे स्वर्गीय अजितदादांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीला भरघोस निधी दिला. ही वस्तुस्थिती असताना केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भलावण करण्यासाठी निधीचे श्रेय पालकमंत्री सामंत यांनी ना.शिंदे यांना दिले असा हल्लाबोल आमदार जाधव यांनी केला.

चिपळूणच्या बांदल हायस्कूल सभागृहात ठाकरे सेनेच्या नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार आमदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे ठाकरे सेनेकडून पराभूत झालेल्या उमेदवारांचाही ते झुंजारपणे विजयासाठी लढले म्हणून प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला.यावेळी आपल्या आवेशपूर्ण भाषणात आमदार जाधव यांनी उमेदवार निवडीपासून उमेदवारांच्या प्रचारापर्यंतचे किस्से,अनुभव सांगतानाच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अनुभवाचे खडे बोल सुनावले. ही वेळ सर्वांसाठी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची आहे असे स्पष्ट मत त्यांनी नोंदवले.

पालकमंत्र्यांवर सडकून टीका…

आ.जाधव यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूण मध्ये आले तेव्हा पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद इमारतीसाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी शंभर कोटींचा निधी दिला असे वक्तव्य केले होते. हाच संदर्भ देत आमदार जाधव म्हणाले की,एखाद्याच्या पोटात शिरून खोटं कसं बोलावं ते कोणी पालकमंत्र्यांकडून शिकावं. आमचा विक्रांत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून जिल्हा परिषद इमारतीसाठी निधीची मागणी केली होती. तेव्हा अजितदादांनी क्षणाचाही विलंब न लावता निधी मंजूर केला. ही वस्तुस्थिती असताना तुम्ही विक्रांतला श्रेय देऊ नका मात्र ज्या अजितदादांनी निधी दिला त्यांना तरी श्रेय द्या.. उगाचच शिंदेसाहेब समोर बसले आहेत म्हणून त्यांची खोटी स्तुती करता हे योग्य नाही असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

इतका पैसा आला कुठून?

माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यावरही आ. जाधव यांनी तोफ डागली. आमदार शेखर निकम यांच्या विरोधात केवळ पैसा नसल्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला असे सांगणारे सदानंद चव्हाण आज प्रत्येक गावात देऊळ बांधकाम असो की वस्तू स्वरूपात साहित्य असो प्रत्येक कामासाठी पैसे वाटप करीत सुटले आहेत. अचानक त्यांच्याकडे इतका प्रचंड पैसा आला कुठून? असा सवाल आ. जाधव यांनी विचारला.

सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग..

राजकारणात जातीपातीला महत्त्व असले तरी आपण जिल्हा परिषदेच्या १४ पैकी १२ गटात वेगवेगळ्या समाजाच्या उमेदवारांना तिकीट देऊन खऱ्या अर्थाने प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जातीपातीचे राजकारण कदापि केले नाही. केवळ कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले असे जाधव यांनी स्पष्ट केले.

विक्रांत जाधव,फैसल कासकर यांची भाषणे

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव व नगरसेवक फैसल कासकर यांची खणखणीत भाषणे झाली. यावेळी सुभाष जाधव,संतोष चव्हाण, सौ नेहा माने, संतोष थेरडे यांनीही मनोगते मांडली.

गटनेता गौरव पाटेकरचा सत्कार

चिपळूण पंचायत समितीमध्ये ठाकरे सेनेचे चार सदस्य निवडून आले आहेत.त्यापैकी उमरोली गणातून विजय झालेले सुशिक्षित तरुण सदस्य गौरव पाटेकर यांची गटनेतापदी निवड झाली असून या सत्कार सोहळ्यात आमदार जाधव यांच्या हस्ते गौरव पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY