रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी रत्नागिरी शहरात घरोघरी सदस्य नोंदणी मोहिमेला वेग आला आहे. कोकणनगर शाखेच्या वतीने शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरसेवक केतन शेटे आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत शाखाप्रमुख विशाल कदम स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत असून, इच्छुक नागरिकांची पक्ष सदस्य म्हणून नोंदणी करत आहेत. केवळ सदस्यसंख्या वाढविणे एवढाच या मोहिमेचा उद्देश नसून, पक्ष आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, स्थानिक प्रश्न जाणून घेणे आणि तळागाळातील संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, यावरही भर दिला जात आहे.

पक्षाची खरी ताकद ही केवळ निवडणुकीतील यशात नसून, जनतेशी असलेल्या सातत्यपूर्ण संपर्कात आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागात असते. याच भूमिकेतून कोकणनगर शाखेने सुरू केलेली ही घरोघरी सदस्य नोंदणी मोहीम रत्नागिरी शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.