दापोलीः- दापोली सायकलिंग क्लबतर्फे 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.30 वाजता दापोली विंटर सायक्लोथॉन 2026, सिझन 10 स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत. ही सायकल स्पर्धा 30 आणि 50 किमी अंतराची असून ती पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
50 किमी कोस्टल सिनिक रूट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते करजगांव, परशुराम भूमी बुरोंडी, तामसतीर्थ, लाडघर, कर्दे, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आसूद, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. 30 किमी सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, आसूद, दापोली असा असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल. हे स्पर्धेचे दहावे पर्व असून आतापर्यंत झालेल्या 9 पर्वांमध्ये संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही अनेक स्पर्धक सहभागी होऊन गेलेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेकजपण आपापल्या कुटुंबासह दापोली काही दिवस मुक्कामासाठी येतात.
येथील पर्यटन स्थळांना भेटी देतात, स्थानिक पदार्थ वस्तू खरेदी करतात, मासे कोकणी जेवणाचा आस्वाद घेतात. देश विदेशात सायकलिंग केलेल्या या सर्वांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे नक्कीच पर्वणी असणार आहे. सायक्लोथॉनसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर असेल. सायकल बिब नंबर 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर 8655874486, 8767285827, 9028741595 हे आहेत. सर्वांनी सराव सुरू करूया आणि आपल्या कुटुंबियांसमवेत यामध्ये सहभागी होत सायकल चालवूया व शारीरिक मानसिक आरोग्य तंदुरूस्त करूया असे आवाहन दापोली सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.