चिपळूण : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी संचलित न्याय हॉस्पिटल, चिपळूण येथील बाह्यरुग्ण तपासणी कक्षाचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अध्यक्ष निलेश भुरण यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. सोसायटी, महाविद्यालय तसेच नॅब हॉस्पिटल, चिपळूण येथे त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत, आगामी काळात होणाऱ्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत निलेश भुरण यांना उमेदवारी देण्याबाबत त्यांनी जाहीर व्यासपीठावरून सकारात्मक भूमिका मांडली.

माजी आमदार डॉ. विनय नातू यांनीही निलेश भुरण यांच्या उमेदवारीबाबत अनुकूल मत व्यक्त केले. निलेश भुरण हे सुशिक्षित असून त्यांचे कार्य चांगले आहे. त्यांना उमेदवारी देण्यास हरकत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते आणि महायुतीतील नेतृत्व घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकाच व्यासपीठावरून दोन प्रमुख नेत्यांनी निलेश भुरण यांच्या नावाबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याने खेर्डीच्या आगामी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत व्यक्त झालेल्या या मतांमुळे निलेश भुरण यांच्या उमेदवारीकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खेर्डीच्या विकासासाठी सुशिक्षित, कार्यक्षम आणि सामाजिक कार्याचा अनुभव असलेला चेहरा म्हणून निलेश भुरण यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे कोणते वळण घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.