जळगाव:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जोरदार टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षांना, लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा चांगलाच छंद दिसतोय ! असं त्या म्हणाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या म्हात्रोली गावातील वीस कातकरी आदिवासी कुटुंबांना मार्च २०२४ मध्ये त्यांची घरे पाडून जबरदस्तीने बेघर करण्यात आले, असा आरोप सर्वहारा जनआंदोलनाने केला आहे. यावरून खडसे यांनी हा टोला लगावला आहे.

यासंदर्भात रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या की, टाईम्स ऑफ इंडियाची बातमी आहे की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सोबतच्या मंडळींनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या म्हात्रोली गावातील २० कातकरी आदिवासी कुटुंबांना मार्च २०२४ मध्ये त्यांची घरे पाडून जबरदस्तीने बेघर केले आहे. ही बातमी खरी असेल तर विधानसभा अध्यक्षांना, लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा चांगलाच छंद दिसतोय ! आधी महाराष्ट्रातील कणखर माणसांनी उभे केलेले अस्सल मराठी पक्ष कुण्या दुसऱ्यांना देऊन मूळ मालकाला पक्षाबाहेर केले आणि आता वंचित घटकांच्या हक्कांच्या घरातून त्यांना बाहेर केले आहे असे त्या म्हणाल्या.