लांजा: मद्यप्राशन करून शाळेत आलेल्या एका व्यक्तीने दोन शिक्षकांशी वाद घालत त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना तालुक्यातील वेरळ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मंगळवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका ३८ वर्षीय तरुणावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद नंदकुमार बळीराम भागवत (वय ५३, शिक्षक वेरळ मराठी शाळा, रा.लांजा, धावणेवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सायंकाळी नंदकुमार भागवत हे दैनंदिन रजिस्टर भरण्याचे शासकीय काम करीत असताना कुणाल शांताराम कुर्णेकर (वय ३८, रा.वेरळ गायदडीवाडी, ता.लांजा) हा मद्यप्राशन करून शाळेत आला. त्यानंतर त्याने शिक्षक नंदकुमार भागवत यांच्या डाव्या कानावर थोपटाने मारून तसेच सहशिक्षक यांना यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच भागवत यांना देखील शर्ट पकडून धकलाबुकल केली.
अशाप्रकारे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कुणाल शांताराम कुर्णेकर याच्यावर भारतीय न्याय संहिता १३२, १३१, १२१(१), ३५२, ३५१(२), महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) (२), प्रमाणे भा.दं.वि. कलम ३५३, ३५२,३३२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव हे करत आहेत.