पुणे – चाकण, दि. ४ नोव्हेंबर – चाकण येथील चक्रेश्वर मंदिरामध्ये आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते चक्रेश्वर देवस्थानच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत देवस्थानच्या विकासकामांबाबत आनंद व्यक्त केला.
आदरणीय अजितदादांनी चक्रेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून साकारलेल्या विविध विकासकामांचे आज लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मंदिर परिसरातील अनेक रस्त्यांचेही सुंदर पद्धतीने काम झाले आहे. अनेक वर्षांपासून चाकणकरांची या देवस्थानच्या विकासकामांची मागणी होती. अजितदादांनी ती पूर्ण केली असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
अजितदादांच्या पश्चात त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी केलेल्या विकासकामांतून साकारलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळत आहे. कुठेही गेलं तरी ज्या ठिकाणी विकासकामांची गरज होती, त्या ठिकाणी दादांनी निधी उपलब्ध करून दिला. राज्यातील अनेक मंदिरांच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. दादांनी दिलेला विकासाचा वारसा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच आज मी आपल्या सर्वांसमोर उभी आहे अशा भावनाही व्यक्त केल्या.
मी नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. अजितदादांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
