लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या आणि पावसामुळे वाहून गेलेल्या कच्च्या मातीच्या बंधाऱ्यांची पुनर्बांधणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रियांका ढोले व नायब तहसीलदार अनिल गोसावी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती सुभाष रामाने आणि उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्वे उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी श्रमदानातून कच्चे मातीचे बंधारे उभारण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे निधीचा अभाव, आवश्यक यंत्रसामग्रीची अनुपलब्धता आणि अलीकडील पावसामुळे काही बंधारे वाहून गेल्याने या उपक्रमाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे केवळ लोकसहभागावर अवलंबून न राहता शासनाने आर्थिक व तांत्रिक पाठबळ देणे आवश्यक असल्याचे कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जिल्हा नियोजन समिती, जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पात्र जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडून कामांचे सर्वेक्षण व प्रस्ताव मागवून नवीन बंधारे, अपूर्ण कामे आणि नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकरची व्यवस्था करण्यापेक्षा पाणी उपलब्ध असतानाच ते अडविणे आणि जमिनीत जिरविणे ही अधिक शाश्वत उपाययोजना आहे. जनता श्रमदानासाठी सज्ज आहे; आता शासनाने निधी आणि प्रशासकीय पाठबळ देऊन या लोकचळवळीला बळ द्यावे, अशी भूमिका दत्ताजी कदम यांनी मांडली आहे.
