मुंबई – दादा… यंदाची दिवाळी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे, पण प्रत्येक भगिनींच्या मनात तुमच्या आठवणींचा दिवा सदैव तेवत राहिल असे सांगत ‘लाडक्या बहिणींची एक पणती अजितदादांच्या स्मृतीसाठी..!’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी राज्यातील प्रत्येक माता – भगिनींना केले आहे.
दिवाळी म्हणजे आनंदाचा… उत्साहाचा आणि आपल्या माणसांसोबत सुखाचे क्षण साजरे करण्याचा सण… पण यंदा या सणाच्या आनंदात एक मोठी पोकळी आहे… आपल्या लाडक्या अजितदादांची उणीव प्रत्येकाच्या मनाला जाणवणार आहे… विशेषतः प्रत्येक बहिणींसाठी ही भाऊबीज भावनांनी भरलेली आहे. ज्या दादांनी लाखो भगिनींच्या आयुष्यात स्वाभिमानाचा… सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रकाश निर्माण केला… ते दादा आज आपल्यात नाहीत… ही जाणीव मनाला चटका लावणारी आहे. म्हणूनच यंदा या दिवाळीत आणि भाऊबीजेच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावर… देवघरात किंवा अंगणात अजितदादांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ एक पणती नक्की प्रज्वलित करा… त्या एका पणतीतून दादांच्या आठवणींना उजाळा देवुया… त्यांच्या कार्याला अभिवादन करुया आणि त्यांनी जपलेल्या महिला सक्षमीकरणाच्या विचारांचा प्रकाश पुढे घेऊन जाऊया असे आवाहनही वैशाली नागवडे यांनी केले आहे.
कारण… काही माणसं आपल्यातून निघून जातात… पण त्यांनी दिलेला आधार… प्रेम आणि आठवणी कधीच संपत नाही… अशा भावनाही वैशाली नागवडे यांनी व्यक्त केल्या आहेत.